सोमवार, १० मे, २०२१

कर लो रेहेम थोडा कर लो रेहेम


 कर लो रेहेम थोडा कर लो रेहेम


'अपेक्षा हे सर्व दु:खांचे मूळ आहे' हे लहानपणीच शिकूनसुद्धा परत परत अपेक्षा करून स्वत: चा विश्वासघात करून घेण्यात मला कसला आनंद मिळतो देव जाणे! सरदारणींच्या पाश्चात्य आणि अपंजाबी पाककलेवर विश्वास ठेवण्याची चूक मी तब्बल 2 वेळा केली आणि त्याची चांगलीच तेलकट आणि मसालेदार फळं मला भोगावी लागली. पंजाबी पदार्थात त्यांचा हात कोणी धरू शकत नसलं तरी इतर प्रांतीय पदार्थ त्या असे काही बनवतात की आपल्याला त्यांचा हात धरून ठेवावासा वाटेल!

या 2 आकस्मिक धक्क्यांनंतर सरदारणींच्या डब्यात डोकवण्यापुर्वी माझ्या डोळ्यांना आणि नाकाला अजुन धक्के मानवतील का असा सारासार विचार करूनच हे धाडस करायच्या सूचना मी मेंदूला दिल्या आहेत.

40 मुलांनी एकत्रितपणे डोकं उठवल्यावर मी शिक्षकखोलीचा आधार घेतला. हातातली डायरी भिरकावून देत मी टेबलवर डोकं ठेवलं. "मॅम, पास्ता खाओगे ?" एका सरदारणीच्या गोड बोलण्यावर मी भुलले आणि तिच्या डब्याकडे मोर्चा वळवला. भूक कडाडून लागली होती. हाच तो क्षण! मी गरमागरम इटालियन पास्त्याची प्रतिमा डोळ्यांपुढे आणत डब्यात डोकावले आणि माझ्या ह्रुदयाला आणि अपेक्षांना एकत्रितच तडे गेले. लालेलाल द्रवपदार्थ वर तरंगत होता. ते तेल आहे हे लक्षात आल्यावर कोणीतरी माझे डोळे काढून घ्यावेत अस फार तीव्रतेने मला वाटलं. मन घट्ट करत मी त्या पदार्थाचं निरीक्षण केलं. 'ये पास्ता है?' न राहवून मी शेवटी विचारलचं. तेलाच्या तलावात मला पास्ता सापडला नसावा असा विचार करत 'काय बावळट आहे ही बाई' असा अतीव क्षूद्र कटाक्ष टाकत तिने माझ्या हातात चमचा कोंबला. "अरे थोडा उपर-नीचे करो ना !" ती म्हणाली. 'उपरनीचे' केल्याशिवाय मला पास्ता सापडला नसता ह्याची खात्री एव्हाना मलाही पटली होतीच. मी धीर एकवटत त्या तलावात चमचा खुपसला. लगोलग 3-4 गरीब बिचारे बुळबुळीत 'पास्ते' गटांगळ्या खात वर आले. तेलानी माखलेल्या त्या असहाय्य नळकाड्यांची मला अतोनात दया आली. 'काश तुम्ही लोक माझ्या कढईत पडला असता.' मी सुस्कारा टाकत पास्त्यांना म्हणाले. चमचा वरखाली करताच गरम मसाल्याचा भपका माझ्या नाकात गेला. मला रडू येऊ लागलं. उग्र सरसो च्या तेलात परतलेला, दिलखुलास लसणाची फोडणी दिलेला, पनीरच्या तुकड्यांची यथेच्छ पेरणी केलेला, मसाल्यांचा पाऊस पाडलेला तो संपुर्ण पंजाबी पास्ता बघून मला भोवळ आली. त्याची चव मला प्रेमाखातर घ्यावी लागली जी शब्दात सांगणे अवघड आहे कारण माझ्या डोळ्यांना तो 'पास्ता' पटलाच नसल्याने त्यांनी मेंदूला असहकार पुकारायला भाग पाडले होते. "वो आज जल्दीमें थी ना तो फटाफटसे पास्ता बना दिया।" माझं कसनुसं तोंड बघून त्या सरदारणीने मला समजवायचा दीनवाणा प्रयत्न केला. एक तर 'जल्दीमें' पास्ता बनत नाही आणि तु जे बनवलयस त्याला पास्ता म्हणत नाहीत असं स्पष्ट उत्तर देण्यापासून मी माझ्या जीभेला पराव्रुत्त केले. काहीतरी बहाणा करून मी तिथून पसार झाले हे वेगळं सांगायला नकोच!

ही जखम ताजी असतानाच मी दुसरी करून घेतली. " मॅम, आजाओ साबूदाना खिचडी लायी है मैंने आज।' खिचडीचं नाव ऐकताच मी झालंगेलं विसरून दुसर्या सरदारणीच्या डब्याकडे धावले. मस्त खोबरं कोथिंबीर लिंबू पेरलेली, दाण्याचं कूट घातलेली, तूप-जीर्याची फोडणी दिलेली मऊमऊ खिचडी मनात आणत अर्थात! डबा उघडताच दिसली टोमॅटो कांद्याचा तडका लावलेली, मसाला मारके बनवलेली पंजाबी तेलकट खिचडी; आणि माझा जगावरचा विश्वासच उडाला!. आज उपवास है ना!" अस जरका मला ही बाई मला म्हणली असती तर पुर्ण महाराष्ट्रातर्फे मी तिची धुलाई केली असती. उपवासाच्या दिवशी मी या खिचडीचा फोटो जरी मराठी उपवासकारांना पाठवला असता तर समाजाने मला वाळीत टाकले असते हे नक्की! चवीला ही पास्त्यापेक्षा बरी असावी असं हिच्या रंगरूपावरून वाटत होतं. मला चव आठवत नाही. (आठवायची ही नाही.)

तर अश्या ह्या 2 बिकट विश्वासघातांमधून मी सहीसलामत बाहेर पडले याचा मला गर्व आहे; त्याचबरोबर 2 वेळच्या जेवणाची भ्रांत झाल्याशिवाय सरदारणींच्या अपंजाबी पाककलेकडे वळायचे नाही असा कानाला खडा लावला आहे. तेव्हापासूनच बहुतेक 'कर लो रेहेम थोडा कर लो रेहेम' हे गाणं जिव्हाळ्याचं वाटू लागलं आहे.

-संज्ञा घाटपांडे- पेंडसे