मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०२१

'स्लीपिंग दिवटी'

 'स्लीपिंग दिवटी'


निद्रावस्थेत माझे द्रवपदार्थात रुपांतर होते असे मला वाटते. जमीन, सतरंजी, गादी, बेड; बुडाखाली ( पोटाखाली ) काय आहे यानी मला काहीच फरक पडत नाही. मी द्रवाचेच गुणधर्म दाखवते. मी धावण्याच्या स्थितीतच झोपते. माझ्या झोपण्याच्या पद्धतीवरून मला व्यसनमुक्तीकेंद्राची गरज आहे असं कुणाला वाटल्यास मी वाईट वाटून घेणार नाही. रात्री थंडी वाजल्यावर साधं पांघरूणही मिळू नये (म्हणजे सापडू नये कारण ते पोटाखाली असत) इतकी मी असहाय होते. केसांच्या सूरनळ्या दाही दिशांना फैलावलेल्या असतात. मी स्वत: सुद्धा फैलावलेलीच असते. अख्या खोलीभर बेड बनवला तरी दुसर्या कोणालाही त्यावर झोपता येऊ नये अश्याप्रकारे आपल्या द्रवसदृश शरीराने तो संपूर्णपणे व्यापून टाकण्याचे कसब माझ्याकडे लहानपणापासूनच आहे. मला डझनभर पांघरुणे दिली तरी शेजारच्या व्यक्तीच्या पांघरुणामध्ये मला विशेष रस असतो. मी कितीही जाड झाले तरी माझ्या हाडांचा टोचकेपणा तसूभरही कमी झालेला नाही. अर्थात माझ्याबरोबरच्या व्यक्तींना आयुष्यभर माझी हाडे आणि टोमणे टोचत राहणार याची त्यांना कल्पना असतेच! कुंभकर्णाची माझ्यावर विशेष माया आहे असं मला वाटतं. माझ्याच बोजड देहाखाली सुमारे ६ तास सलग दाबला गेल्यानी व त्यामुळे त्याला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यानी माझ्या हाताचा पंजा निकामी होता होता बर्याच वेळा वाचला आहे. सकाळी त्यावर माझ्या क्रूर थपडांचा वर्षाव झाल्यानी तसा तो नेहेमी शुद्धीवर येतोच.

जाहिरातींमध्ये, चित्रपटांमध्ये सुंदर, सरळसोट, व्यवथित झोपलेले लोकं (विशेष करून नायिका) दाखवण्याचा धादांत खोटारडेपणा का केला जातो? हा संशोधनाचा विषय आहे. (का सामान्य लोकं खरच तसे झोपतात?) डोकं चालत नसलेल्या अवस्थेतही सुन्दर दिसणं या बायका कश्या जमवतात माहित नाही. आम्हाला तर जागेपणीही जमलेलं नाही. मरणाची झोप आल्यावर कुठलाही प्राणी (मी तरी) आपण नीट झोपत आहोत का असा विचार करत असेल असं मला तरी वाटत नाही. मला झोप आल्यावर (जी मला सारखीच आणि बरीच येते) मला नजरेसमोर फक्त आणि फक्त बेडच दिसतो. बाकी सगळ्या गोष्टी आपोआपच धूसर दिसतात. म्हणजे तशी मी माझ्या मेंदूची जोडणीच करून ठेवलेली आहे. पुरेशी झोप मिळवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते. माणसाच्या अन्न, वस्त्र , निवारा या किमान गरजांमध्ये झोपेला जागा नं मिळण यासारखी दुर्दैवी गोष्ट दुसरी नाही. झोपेची किंमत ती येऊ न लागल्यावरच कळते. झोप या क्रियेमुळे शरीराला आणि मनाला जो ताजेपणा आणि पवित्रता येते त्याला तोड नाही. झोप ही जगातील सर्वाधिक सुंदर आणि आवश्यक गोष्ट आहे. माझे एक चतुर्थांश आयुष्य व्यापणाऱ्या या एकमेवाद्वितीय क्रियेला माझा कडक सलाम आणि खूप खूप प्रेम!

संंज्ञा घाटपांंडे - पेंंडसे



आर्टिस्टांची लक्षणं

 आर्टिस्टांची लक्षणं


हे ‘चेतावणीपत्र’ त्यांच्यासाठी आहे ज्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, व्यावसायिक अश्या कुठल्याही प्रकारे ‘आर्टिस्ट’ या जमातीशी संबंध येतो. या लोकांशी व्यवहार करणं हे अत्यंत धोक्याचं, जिकिरीच आणि नाजूक काम आहे. ‘आर्टिस्टांपासून सावध रहा’ अशी पाटी घरासाठी बनवून घेता आली तर उत्तम. ज्यामुळे त्यांचा लहरीपणा, आगाऊपणा, माणुसघाणेपणा, विक्षिप्तपणा, विसराळूपणा, यांचे खापर तुमच्या माथी फुटणार नाही.
आर्टिस्ट्स बरोबर एकाच घरात राहायचे असेल तर शांत राहण्याची आणि सोडून देण्याची कला तुम्हाला अवगत असायलाच हवी. मुख्य म्हणजे ‘ते या जगात नसतात त्याचं वेगळं जग ते निर्माण करतात’ हे सत्य तुम्हाला पचवायला हवं.

गबाळग्रंथ, एक-दुसर्याचा दुरान्वयही संबंध नसणारे कपडे घालून, केस वगैरे न विंचरता, घरगुती चपला घालून बाहेर पडताना, ‘आरशात तरी बघितलयस का?’ असे चिथावणीखोर उद्गार काढायचा वेडेपणा अजिबात करू नये. ‘आर्टिस्ट’ हा जन्मजात आळशी असतो. स्वत:चे अढळपद सोडून, बुड हलवून तो घराबाहेर जात आहे, हीच मुळात किती स्तुस्त्य गोष्ट आहे हे सामान्य माणसांना समजणार नाही. मग नंतर, “मी माझ्या कामाला चाल्लोय. इतरांना नेत्रसुख द्यायला नाही.” अश्या प्रकारची उत्तरे मिळाल्यास समस्त आर्टिस्ट जमातीवर निर्लज्जपणाचा ठपका ठेवणे अत्यंत अन्यायकारक आहे.

कलाकाराला कला ‘होत’ असताना मध्ये मध्ये बोटं लावायला जाऊ नये. ती एक खूप क्लिष्ट आणि लांबलचक प्रक्रिया आहे. ती आपल्या गतीने आणि लहरीने होते. कलेची ‘डिलिव्हरी’ नेहेमी नॉर्मलच होते. कलेचं कधी ‘सिझेरिअन’ करता येत नाही. त्यामुळे “पटकन सुचव नं! किती वेळ!” असे खोचक टोमणे शेजारी उभं राहून मारू नयेत.

कलाकाराला काहीतरी मोठं, अद्वितीय, भन्नाट सुचत असताना, “जेवलीस का?”, “अंघोळ केलीस का?” वगैरे असे क्षुद्र प्रश्न विचारून त्यांचा समाधी भंग करू नये. एखाद्या सुंदर कल्पनपुढे शिळं, गार, कमी, नावडीचं जेवण कलाकाराच्या लेखी काहीच नसत. मुळातच जेवण, झोप, अंघोळ, दिवस-रात्र कलेपुढे हे सगळं शुल्लक असत. (कलाकारापुढे असं म्हणणं जास्त योग्य ठरेल कारण त्याची इच्छा असताना साग्रसंगीत जेवण, १२-१५ तास सलग झोप, हे सगळं कसं मिळवायचं हे त्यांना ठाउक असतं.)

चित्रकार कलेत बुडालेला असताना, खास करून रंग, पाणी घेऊन बसलेला असताना, त्याच्यापुढे चहा-कॉफी चे कप ठेवण्याचा प्रेमळपणा करू नये. असे केल्यास चहाच्या कपात रंगाचा ब्रश बुडालाच म्हणून समजा. संपूर्ण कारकिर्दीत एकदा तरी हा खूळचटपणा केल्याशिवाय कलाकार ‘कलाकार’ म्हणला जाऊ शकत नाही. तसा नियमच आहे.

‘चित्र काढून पैसे कसे कमावणार?’ एवढ्याश्या पैशात संसार चालणार आहे का?’ वगैरे चिल्लर प्रश्न विचारायच्या आधी, “ए, माझं पोर्ट्रेट काढून दे नं भारीतलं.”, “ए ही एक आकृती काढून दे नं इथे शेजारी”, “अरे हे खूप सोपं आहे. हे बघ. इथे हॅपी बड्डे लिही, इथे केक टाक की झालं ग्रीटिंग तयार.”, “काय यार! याचे पण पैसे घेणार का तू माझ्याकडून आता?” असं म्हणणारे आपणच तर पहिले नव्हतो नं? हे एकदा जरूर तपासून पहावं. कलाकाराचा उजवा मेंदू अजिबातच चालत नाही असं नसतं. आपल्यापुरते पैसे कमावणे, किवा आहे त्या पैशात मजेत राहणे यापैकी एक गोष्ट प्रत्येक कलाकाराला नक्कीच जमते.

कलाकारी हा अत्यंत खर्चिक प्रकार आहे. त्याला कोणीच काही करू शकत नाही. “मागच्याच आठवड्यात तर नवीन रंग आणले होते, त्याचं काय झालं?” असे प्रश्न विचारल्यास रागीट कटाक्षांशिवाय दुसरं काही मिळण्याची अपेक्षा ठेवू नये. चित्रविचित्र शौक पाळण्यापेक्षा रंगांवर खर्च होणे कधीही उत्तम!

तुम्ही ‘आर्टिस्ट’ बरोबर राहणारे ‘नॉन-आर्टिस्ट’ असाल तर, ‘मॅजेंटा’ कलरची बॉर्डर वाला ‘व्हर्मिलियन’ कलरचा कुरता बरोब्बर शोधून काढणं, किवा ‘वॅनडाईक ब्राऊन’ कलरच्या कपाटातून ‘कोबाल्ट ब्लू’ कलरचा शर्ट शोधणं तुम्हाला शिकून घ्यावं लागेल. तुम्हाला रंग कळत नसतील तर शेंबडा कलर, शी कलर, सिमेंट कलर, आमसूल कलर, चटणी कलर, याच भाषेत तुम्हाला रंगसंगती समजावली जाईल.

गणित न येणं हे खर्या कलाकाराच प्रमुख लक्षण आहे. आकडेवारी बोटं मोजत करणं, १८+२२ साठी लगेच कॅलक्युलेटर’ शोधण, बँकेचे व्यवहार, इंशुरन्स, पोलिसीज वगैरे विषय आयुष्यात आल्यावर आकाशात बघणं हे कलाकाराचे मुलभूत गुण आहेत. आता कलाकाराला अशी दैवी देणगी मिळाल्यावर घरातल्या इतर लोकांना त्याच्या या अश्या लहान-सहान गोष्टी निस्तरणं क्रमप्राप्तच आहे.
आर्टिस्ट तुमच्याकडे बघत असेल तरी त्याला तुम्ही दिसत असालच असं नाही. दिसणं, आणि दिसलेलं नोंदलं जाणं यातला फरक आर्टिस्ट तुम्हाला हळूहळू शिकवेल, दुधाकडे बघत असतानाही दुध उतू जाणं, एखाद्याला विचित्र वाटेल इतपत टक लावून त्याच्याकडे बघणं किवा एखादा बोलत असताना त्याच्याकडे ढुंकूनही न बघणं हा आगाऊपणा नसून अत्युच्च सृजनशीलतेचं लक्षण आहे. आर्टिस्ट ना कधीही, कुठेही, काहीही सुचत असू शकतं, आणि दुर्दैवानी ‘मल्टीटास्कींग’ त्यांना जमत नाही. त्यामुळे विचार करताना ते फक्त विचारच करू शकतात. १-२ तास नुसतं बसणं, अगदी काहीही न करता याकडे इतरांनी रागानी नाही तर पवित्रपणे पाहायला शिकलं पाहिजे.

त्याचप्रमाणे, मधूनच अचानक ‘अरेरे’!, ‘शी’, ‘वाह!’ असे उद्गार ऐकू आल्यास, काहीही कारण नसताना, गडगडाटासारखे हास्य ऐकु आल्यास, अचानक डोळे डबडबलेले दिसल्यास घाबरून जाऊ नये, ही वेडेपणाची किवा प्रेमाची लक्षणे नसून ‘आर्टिस्टपणाची’ लक्षणेही असू शकतात. इतके भावनाप्रधान विचार असल्याशिवाय आतून एखादी कला बाहेर पडणं निव्वळ अशक्य आहे.

विसराळूपणा आणि आर्टिस्ट यांचा घनिष्ट संबंध असतो. ‘आपण एखाद्या खोलीत का आलो?’ हे विसरणे, अंघोळीची सर्व तयारी करून अंघोळीला जायचं विसरणे, सकाळी काय खाल्लं हे प्रयत्न करूनही न आठवणे, कुकरला लावलेला भात विसरल्यामुळे जळून जाणे या फार सामान्य घटना आहेत. त्यासाठी दवाखाना गाठायची गरज नाही. याच आर्टिस्ट ना अचानकपणे १० वर्षापूर्वी कोणी कोणाला काय बोललं होतं?, एखाद्या २० वर्षापूर्वीच्या बारशात कुणी कुठल्या रंगाचा झब्बा घातला होता हे अचूक आठवतं. याचाच अर्थ डोक्यात काही बिघाड नसतो. फक्त सामान्य माणसाकडे आठवणीचे पद्धतशीर कप्पे असले तर आर्टिस्टच्या डोक्यात पसारा असतो त्यामुळे त्याच्या मेंदूला एवढ्या अवाढव्य दस्तऐवजांमधून एखादी ठराविक गोष्ट शोधायला जर जास्त वेळ लागतो इतकच.

‘शौचालय’ हे आर्टिस्टचं दुसर घर असतं. आतमध्ये जर तो बराच वेळ काढत असेल तर याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असता. कारण बाहेर हवा तेवढा शांतपणा न मिळाल्यामुळेच त्याच्यावर आत बसून विचार पूर्ण करण्याची वेळ येते. अर्थात आतमधल्या बैठकीइतकी फलदायी बैठक दुसरी नसते. तिथे बसून सुचणाऱ्या कल्पना उच्च दर्जाच्या असतात. त्यामुळे बाहेरून. “किती वेळ लागणारे? झोपला आहेस का आतमध्ये?” अशी आगपाखड करण्यापेक्षा आर्टिस्ट आत शिरायच्या आत आपले कार्यक्रम उरकून घेणे सोयीस्कर!

एखाद्या मुरलेल्या आर्टिस्ट बरोबर कौटुंबिक समारंभांना जायची वेळ आल्यास एखादा हातरुमाल अथवा तत्सम गोष्ट नक्की बरोबर घ्यावी. आपल्याला तोंड झाकायला उपयोगी पडते. कारण, “काय चरबी ओसंडतीए या बाईची”, “किती ‘मिस-प्रपोरशनेट’ माणूस आहे नाही!”, “अहो तुम्हाला लाईट कलर सुट नाही होणार. तुमचा स्किन टोन डार्क आहे ना.” अशी कुठलीही विधान हे लोक खुलेआम करू शकतात. तेव्हा त्यांच्या बरोबर तुम्हालाही उद्धट, मवाली, लफंगे या वर्गात गणलं जाऊ शकतं.

एकंदरीतच आर्टिस्ट जमातीबरोबर राहणं काही लोकांना काळ्या पाण्याच्या शिक्षेसमान वाटू शकतं; परंतु ही जमात नष्ट झाल्यास संपूर्ण मानवजातीचे आयुष्य सर्व अर्थाने निरर्थक होईल हे नक्की. आयुष्य प्रत्येकालाच मिळतं पण ते सुंदर बनवायचं काम हे लोकं करत असतात त्यामुळे ‘सेहे लेंगे थोडा’ असा विचार करून तुमच्या आयुष्यातल्या अश्या वेडगळ ‘आर्टिस्ट’ला जपून ठेवा.

©संज्ञा घाटपांडे-पेंडसे


शिव्या

शिव्या


 शिव्या हा जगातल्या सगळ्या भाषांमधल्या वांङमयातला एक अद्भुत ‘मास्टरपीस’ आहे.


शिव्या वाक्याची सुरुवात आहे; वाक्याचा शेवट आहे.

मैत्रीची सुरुवात आहे; मैत्रीचा शेवट आहे.

शिव्या ही मुळात एक भावना आहे. त्याला व्याकरणात काही महत्व नसलं तरी मानवी आयुष्यात खूप महत्व आहे. चार-पाच अर्वाच्च शिव्या ऐकल्याशिवाय आपल्या डोक्यात उजेड पडत नाही आणि ४-५ कचकचीत शिव्या दिल्याशिवाय इतरांच्या डोक्यात उजेड पडत नाही. वेगवेगळ्या नात्यांना, स्वभावांना आणि अवयवांना शिव्यांनी आपल्यात सामावून घेतले आहे. तसेच चू, भ, म या अक्षरांना एक वेगळेच वलय निर्माण करून दिले आहे. सुसंस्कारांची ‘पुटं’ एका फटक्यात उचकटण्याची ताकद शिव्यांमध्ये आहे. एका शिवीवर हजर होणारी मित्रमंडळी तुम्हाला मिळाली असतील तर तुम्ही नशीबवान.
लहान मुलांना शिव्या ऐकायची परवानगी नसते. त्यांच्यासाठी चांदण्या, टिंब, किवा बीप यांची सोय केलेली आहे.

आपल्या मेंदूला आग लागल्यास शिव्या फायरब्रिगेडच काम देखील करतात. राग आल्यावर चारपाच शिव्या हासडणे आणि उन्हाळ्यात तहान लागल्यावर माठातलं गार पाणी पिणे ह्य्यामुळे सारख्याच प्रकारची शांतता आणि समाधान मिळतं. शिव्या हे एक वरदान आहे. एक समाधान आहे. शिव्या या कुणी शिकवत नाही. त्या आपापल्याच शिकाव्या लागतात. त्यांचा वाक्यात उपयोगही आपला आपल्यालाच करावा लागतो. त्यामुळे त्या शिका. त्या वापरा आणि मोकळे व्हा! कारण, शास्त्र असतं ते!
-संज्ञा घाटपांडे–पेंडसे



पाळी

पाळी

 डिस्क्लेमर

माझ्या या लेखाला मी स्वतः च 'A' सरटिफिकेट देते. त्यामुळे ज्यांचे 'मानसिक' वय १८ च्या अलीकडे आहे किवा 'पाळी' शब्द ऐकल्यावर जे कान, नाक, डोळे मिटून घेणारी माकडे बनतात त्यांनी व्यक्त केलेली नाराजी ग्राह्य धरली जाणार नाही.

पाळी
एक, दोन किंवा जास्तीत जास्त ३ वेळा नवनिर्मितीचा आनंद घेण्याच्या बदल्यात दर महिन्याचा हा हकनाक रक्तपात म्हणजे निसर्गाने केलेला भ्रष्टाचार नाही तर अजुन काय आहे?
वयाच्या १३ - १४ वर्षापासून ते ४५-५० वर्षापर्यंत ही 'मासिक पाळी' वेताळासारखी समस्त स्त्री जातीच्या मानगुटीवर बसून राहते. निसर्गाच्या या अजब, अतार्किक हिशोबची उकल मला आजतागायत झालेली नाही. विज्ञान इतके प्रगत होऊनही निसर्गाची ही घोडचूक सुधारण्यासाठी कुठलाही खात्रीशीर आणि सुरक्षित उपाय मानवजातीला सापडलेला नाही हे विशेष खेदजनक आहे.
जी मुलगी स्वतः अजुन बाल्यावस्थेत आहे तिला नवनिर्मितीची देणगी देऊन फायदा काय ? तसेच जी बाई स्वतः च्या नातवंडांच्या आगमनाची वाट पहात आहे तिच्याकडे ही शक्ती शाबूत ठेवून तरी फायदा काय ?
याचा काहीच ताळमेळ बसत नाही. गणित काही फक्त माझेच कच्चे नाही. थोडक्यात चुका कुणालाच चुकलेल्या नाहीत.

दर महिन्याला या सर्वाधिक नावडत्या गोष्टीची वाट बघावी लागणे या वाक्यातच किती विरोधाभास आहे!
पाळी आली तरी कटकट नाही तरी कटकट. तारखांबरोबरचा हा खो-खो सर्वच स्त्रीयांना अटळ आहे.

सण - समारंभ हिला विशेष आवडतात. काहीही करून तारखा जुळवून आणणे यामध्ये तिला एक प्रकारचा आसुरी आनंद मिळत असला पाहिजे. तसेच प्रवासात अनपेक्षित रित्या अवतरणे हा तिचा छंद आहे. हिच्या लहरी सांभाळणे हे स्त्रियांचे अनैच्छिक कर्तव्य आहे.

पाळी शांतपणे येते आणि जाते असे असते तरी सुसह्य झाले असते परंतु तसे होत नाही. येताना ती पोटदुखी, कंबरदुखी, राग, चिडचिड, कंटाळा नैराश्य असा गोतावळा बरोबर घेऊनच येते. या काळात या सर्वांना सोबत घेऊन चेहऱ्यावर हसू ठेवून नेहमीची दिनचर्या पार पाडणे म्हणजे तारेवरची कसरत असते.

तारखा जवळ आल्या की हृदयाचे ठोके वाढतात. आपण कुठे, काय करत असताना गळती सुरू होईल याचा काही नेम नसतो. जय्यत तयारी केलेली असताना न येणे आणि कल्पनाही केलेली नसताना येणे हाही तिचा छंद आहे. आपली झालेली पंचाईत बघून तिला समाधान मिळत असावं.

समस्त स्त्रीलिंगी व्यक्तिंप्रमाणे हिलाही हिच्यावर पैसे उधळलेले आवडतात. तिला शोषून घेण्यासाठी दर महिन्याला खर्च केलेल्या प‌ॅडस्, टॅंपॉन्स अथवा तत्सम गोष्टींची बचत करता आली असती तर आज मी अति- श्रीमंत वर्गात गणले गेले असते.

घरोघरी बघितल्या जाणाऱ्या मालिका अथवा सिनेमांमध्ये, "मी तुला ९ महिने पोटात वाढवले इ. इ."महा गुळगुळीत, रटाळ डायलॉग ऐवजी, "मी तुझ्यासाठी ३० वर्ष पाळी सहन केली."हा डायलॉग लिहीण्याची हिम्मत एखाद्या तरी सृजनशील लेखकाने दाखवली तर तो अधिक ह्र्दयांना स्पर्शून जाईल.

एरवी आम्ही सामान्य महिला पाळीच्या नावाने बोटे मोडत असताना, 'पाळी ही कशी सुंदर गोष्ट आहे, आपल्याला निसर्गाने किती मोठी शक्ती दिली आहे, पाळी कडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलायला हवा.' वगैरे खुळचट, कुचकामी विचार मांडणारा एक अविश्वसनीय, फुटीरवादी गट आमचे मतपरिवर्तन करण्याचा क्षीण प्रयत्न करत असतो. या गटाकडे आम्हा सर्व पीडित महिलांची गर्भाशयं सांभाळायला द्यायला हवीत. पोट धरून, वाहणाऱ्या रक्ताकडे बघताना, 'पाळी ही एक सुंदर गोष्ट आहे.' असा संदेश माझा मेंदू तरी मला कदापि देणार नाही. रक्ताचा एक एक थेंब असा वाया जाताना बघून मनाला यातना होतात. यासाठी माझ्या दातांनी किती अन्न चावले असेल, माझ्या पचनसंस्थेने किती अन्न पचवले असेल याला गणतीच नाही. शक्तीचा आणि रक्ताचा किती हा अपव्यय!

निसर्ग एवढाच जादुई असता तर त्याने थोडी दयाबुध्दी दाखवून आम्हाला 'प्रजनना' ऐवजी 'दुभाजना' ची शक्ती द्यायला हवी होती. अत्यल्प पुनरुत्पादन साठी ३० वर्ष ही मासिक आणि मानसिक छळ छावणी सहन करणे हा कुठला न्याय? एका हाताने वरदान आणि दुसऱ्या हाताने शाप याला काय अर्थ आहे ?

सुरुवातीच्या काळात पाळी बद्दल वाटणाऱ्या लाजेची जागा आता निर्लज्जपणानी घेतली आहे. 'मला बरं नाही.' वगैरे थोतांड सांगण्यापेक्षा आता मी सरळ 'माझी पाळी चालू आहे मी येणार नाही.' असे सांगू शकते. जे स्त्रियांना सहन करावं लागत ते जगाला ऐकून घ्यावं च लागेल.

डोळे गच्च मिटून, सर्व शक्ती एकवटून, या अग्निपरीक्षेतून पार होताना, आज पूजेला येणार नसशील ना? असल्या फाजील, अंधश्रद्धाळू, भोचक शंका घेऊन अनेक स्त्रीशत्रू आमच्या भोवती उभे राहून आगीत तेल ओतण्याचे काम मनोभावे करत असतात. त्यांच्याशी त्वेषाने लढायचे मी आता सोडून दिले आहे. एक छद्मी हास्य फेकून नटून थटून मी पूजेला हजर होते हेच त्यांना चोख उत्तर! असलाच जर देव तर त्यानेच निर्माण केलेली गोष्ट त्याला चालवून घ्यावीच लागेल की!

पाळी ही निव्वळ कटकट आहे. त्या सुमारास आमच्या भोवती एक धोकाप्रवण वलय तयार होते. त्यात आजूबाजूची मंडळी आल्यास आणि आमच्या परिस्थितीजन्य आगडोंबाची शिकार झाल्यास निसर्गाला काय ते बोलावे कारण पाळी ही जर निसर्गाची किमया असेल तर आमचा लहरीपणा ही सुद्धा निसर्गाचीच किमया आहे.

या संवेदनशील काळात पुरुष वर्गाने आम्हा आजूबाजूच्या स्त्रियांना निमूटपणे जपणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. पाळी आहे म्हणून तुम्ही आहात, याची पदोपदी जाणीव ठेवून या दिव्यातून पार होण्यास जमेल तसा आधार देण्याची आता पुरुषांची पाळी आहे.

- संज्ञा घाटपांडे पेंडसे

नाम ही काफी है।


नाम ही काफी है।

 संज्ञा !


माझ्या ह्या विलक्षण नावाचा महाराष्ट्र सोडल्यावर इतक्या वेळा खून होणार आहे हे जर माझ्या आईला आधी कळलं असतं तर कदाचित आज माझंही नाव 'एक हाक मारली की 10 धावत येतील' या प्रकारातलं ठेवलं गेलं असतं.

'सं' आणि ज्ञा ही दोनच अक्षरं असलेलं माझं छोटसं, छानसं नाव या परराज्यातील तोंडातल्या तोंडात, अस्पष्ट बोलणार्या लोकांना बोलता येणं कितीही अशक्यप्राय असलं तरी दरवेळी त्यांच्या सदोष उच्चारण कलेवर मला तितकाच राग येतो. तसेच त्यांना आपल्या नावाचा उच्चार करता येत नाहिये याचं जराही वाईट वाटत नाहिये यावर अजून जास्त राग येतो.

कुठल्याही नवीन अमराठी माणसाला मला माझं नाव किमान दोन ते तीन वेळा समजावून सांगावं लागतं. एकदा सलगपणे, एकदा दोन्ही अक्षरांवर जोर देऊन, एकदा 'लिप-मुव्हमेंट' वापरून. पण दर वेळी माझे अथक आणि प्रामाणिक प्रयत्न वाया जातात आणि माझ्या नावाची सौदन्या, सौधन्या , संदनया , संग्या, संध्या इतकेच नाही तर अगदी सुगंधा, सुक्ष्मा इ. 100 शकले होतात. नवीन ओळख होतानाचा माझा संवाद ठरलेला असतो.
"आपका नाम क्या है?"
"संज्ञा."
"क्या ?"
"संज्ञा. सं ज्ञा. S O U D N Y A." ( इग्रजीमधे अशाप्रकारे शब्द-फोड केल्यावर काही लोकांना थोडंफार लक्षात येत किंवा किमान ते तसं दाखवतात तरी.)
आता कुणीही नाव विचारल्यावर पहिल्यांदा मनात हेच येतं, " रेहेने दो वैसे भी आप बोल नाही पाओगे!" पण इतका उच्चकोटीचा आगाऊपणा करायला मन अजून धजावत नाही.

पहिल्यांदा माझं नाव ऐकल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया मजेदार असतात. काही लोक सुरुवातीलाच पांढरे निषाण फडकवून 'मिसेस पेंड्से' वर उतरतात. काही लोक जिभेला धार लावायचा विफल प्रयत्न करून बघतात. थोडेसे 'जिव्हापिडन' झाले की प्रयत्न आणि मला दोन्ही सोडून देतात. तिसर्या वर्गातील लोक मात्र इरेला पेटतात. पुरती बोबडी वळेपर्यत ते शस्त्र टाकत नाहीत. माझ्या नावाच्या बर्यापैकी जवळचा उच्चार ते करूनच सोडतात. काही लोकांना नुसतं ऐकूनच लक्षात येतं की हे काही आपल्या आवाक्यातलं काम नाही मग ते चलाखीने 'अच्छा है ! अलग है।' वगैरे म्हणून अलगदपणे आपल्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालतात. काही लोक 'नाचता येइना अंगण वाकडे' प्रकारातले असतात 'सं ज्ञा' म्हणता न आल्याने माझ नाव त्यांच्या लेखी मग 'अजीब' आणि 'नामुमकीन' होतं. काही लोकं,' पडलो तरी नाक वर' या प्रकारातले असतात. स आणि ज्ञ या अक्ष्ररांच्या जवळपास जाणारे विचित्र उद्गार काढून आपण कसं बरोबरच उच्चारलं आहे हे मला पटवून देतात. मनातल्या मनात कपाळावर हात मारल्याशिवाय मग माझ्याकडे दुसरा काही इलाज रहात नाही.

अश्या या पेचप्रसंगांतून मला नेहेमीच जावं लागतं म्हणून नव्याने पालक बनणार्या लोकांना माझी विनंती आहे की आपल्या मुलांची दुर्मिळ नावे ठेवायची असतील तर त्या नावांच्या उच्चाराबरोबरच मुलांना अमाप सहनशक्ती, धीर आणि न रागवता चिकाटीने ते समजावून सांगण्याची कला हे ही शिकवणे अत्यंत गरजेचे आहे.

अर्थात कानावर कितीही अत्याचार झाले तरी मला माझे नाव अत्यंत प्रिय आहे. कारण माझ्या नावाच्या उच्चारादरम्यानच लोकांना जो चटका बसतो तो माझ्या व्यक्तिमत्वाची झलक देण्यासाठी पुरेसा असतो. सं ज्ञा!
नाम ही काफी है!

-संंज्ञा घाटपांंडे -पेंंडसे



.

मी आणि माझी युद्धभुमी

 मी आणि माझी युद्धभुमी


स्वयंपाकघराचा माझ्याशी कधी पुसटसाही संबंध येईल असं मला वाटलं नव्हतं. तोपर्यंत 'आई' नावाची भिंगरी माझ्या मागे-पुढे सतत असायची. आई कामाला गेल्यानंतरच्या कष्टप्रद जीवनात स्वत:चं बुड उचलून पाणी आणायला किंवा खाऊचे डब्बे धुंडाळण्यासाठी किंवा चहाची तीव्र तल्ल्फ शमवण्यासाठी एवढेच काय ते त्या भागात जाणे होत असे. लग्न झाल्यानंतर मी पहिल्यांदा या युद्धभुमीवर पाऊल ठेवले.

चित्रविचित्र, कडक नकाशे पचवल्यानंतर, बेचव भाज्या घशाखाली उतरवल्यानंतर, पचनसंस्थेने असहकार पुकारल्यावर मात्र मला या कलाशास्त्राला गंभीरपणे घ्यावेच लागले.

शब्दशः 'Do or Die' हे तत्त्व स्वीकारुन मी लढायला तयार झाले. नेहेमीप्रमाणे 'One Man Army' स्टाइलने!

त्या निर्मनुष्य भागात शिरल्यावर डाळ, तांदूळ, कणीक अश्या मला अनेक कुतुहलजनक गोष्टी मला दिसल्या. सरसकट डबा आणि भांड सोडून मी ग़ंज, वाडगा, मिसळण वगैरे वर्ग़ीकरण करायला शिकले. पोळी करताना स्वतः प्रदक्षिणा न घालता अथवा पोळपाट गोल न फिरवता पोळ्या लाटायला शिकले. कुकर नावाचं वैज्ञानिक खेळणं वापरायला शिकले. भुकेचे रोजचे हल्ले परतवता‌-परतवता मी नकळतपणे तरबेज होऊ लागले. खिचडी मुगाच्या डाळीची बनते. चण्याच्या डाळीची नाही. हे आता मला समजले आहे. एवढेच नाही तर चण्याची डाळ म्हणजेच हरभर्याची डाळ हे सुद्ध: मी ओळखले आहे. पाण्यात पडल्यावर पोहोता येते त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात धडपडल्यावर स्वयंपाक येतोच हे माझ्यासारख्या शेंडेफळ पोरीने सिद्ध करुन दाख़वले आहे. या प्रगतीबद्दल मला माझा अभिमान वाटतो.

याचे श्रेय अर्थातच फोनवर माझ्या असंख्य वायफळ प्रश्नांना सहनशीलपणे तोंड देणार्या माझ्या आईला, माझ्या घोर अज्ञानावर न हसता मला सोप्या, नवीन पदार्थांच्या रेसिपि देण्याची जिद्द दाखवणार्या माझ्या सासुला, वयाच्या 80व्या वर्षी माझ्या बरोबरीने मैदानात उतरणार्या माझ्या आजेसासुला, माझ्या जळक्या काचर्यांच्या खरपुड्या मागून खाणार्या माझ्या उदार बाबाला आणि माझी टणक साबुदाणा खिचडी खुषीने खाणर्या माझ्या शूर नवर्याला आणि सासर्यांना जाते.
त्यांच्याशिवाय माझा या युद्धभुमीवर टिकाव लागणे निव्वळ अशक्य होते.

माझ्या हातचे अन्न आता गायी-म्हशी, डुकरे, कुत्री यांना न जाता मनुष्यप्राण्यांना खाता येण्याइतपत चविष्ट होऊ लागले आहे; हे किती कौतुकास्पद आहे! पोळी, भाजी, आमटी कोशिंबीर अश्या एक-एक पायर्या चढत चढत इडली, डोसा, असे दाक्षिणात्य पदार्थ, पालक-पनीर मॉं की दाल, असे उत्तर हिंदुस्थानी पदार्थ बनवण्याइतपत माझी मजल गेली आहे. हल्लीच माझ्या पाककलेत 'केक' ची भर पडली आहे. केवळ 3 वर्षातील ही देदीप्यमान कामगिरी थक्क करणारी आहे.

आजकाल स्वयंपाकघरात उभं राहून पांढरे निशाण फडकवत हताशपणे आपला पराभव स्वीकारणारी 'मी' माझ्या स्वप्नांत वरचेवर येत नाही हा माझ्या पाकप्रगती चा भक्कम पुरावा म्हणता येईल. मला माझ्याकडून माझ्या भविष्यातील 'पाकप्रवासा'साठी खूप खूप शुभेच्छा! खात रहा ! खिलवत रहा!

ता.क. स्वयंपाक मला कालही आवडत नव्हता आणि आजही आवडत नाही. हे वाचून अनपेक्षित धाडी अपेक्षित नाहीत.

-संज्ञा घाटपांडे‌‌-पेंडसे