मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

 मातृ देवो भव!


गेल्या काही वर्षांमध्ये मला ‘आया’ हा प्रकार खूप वैशिष्ट्यपूर्ण, कुतुहलजनक आहे असं लक्षात आलं. समाजातील एकंदरीत आया किवा ‘आईपणा’ हा खूप अभ्यासाचा विषय आहे. आई बनण्याची इच्छा निर्माण झालेल्या (किंवा निर्माण केली गेलेल्या) मुलींपासून ज्या आयांच्या मुलांची मुलं आता आई-बाबा बनण्याच्या वाटेवर आहेत अशा अनेक आयांचे मी निरीक्षण केले. अजूनही करत आहे. ‘मूल’ ही ‘दैवी देणगी’ असल्याच्या भावनेपासून ‘मालमत्ता’ असल्याच्या भावनेपर्यंतचा त्यांचा प्रवास अतिशय आश्चर्यकारक आहे .

मनुष्य प्राण्याला मुळातच ‘मूर्तिपूजेची’ नैसर्गिक हौस असल्यामुळे त्यांनी ती करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले त्यातला हा एक सोयीस्कर मार्ग ! ‘मातृपूजा’. ‘आई म्हणजे दैवत’ खोलवर रुजलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये (कठोर शब्दात ) आपला ‘भाव’ वाढवण्यासाठीचा एका स्त्रीकडील हा समाजमान्य जालीम उपाय आहे असे माझे निरीक्षण सांगते. आई होण्याची नैसर्गिक भावना, सामाजिक गरज, पती –पत्नी च्या नात्यातील शाश्वतीचा उपाय (का बंधन ?) भविष्याची तरतूद, अलिखित कर्तव्य, घराणं पुढे चालवण्याची गरज, एक नैसर्गिक चमत्काराची अनुभूति घेण्याची संधि अशी अनेक ‘गाजर’ वेगवेगळ्या मार्गांनी दाखवून तिची पद्धतशीर ‘मेंदू- धुलाई’ केली जाते. आणि अश्या प्रकारे एक आई जन्माला येते.

एक बाई आई बनते तेव्हा तिची किंमत वाढते. मग तिलाही वाटतं की आपण आता महत्वाची व्यक्ति झालो. आपल्यावर एक मोठी जबाबदारी आली . आणि ती जबाबदारी कधी शस्त्र म्हणून आपल्याच मुलांवर चालवून त्यांच्या मनात स्वत: विषयी मायमिश्रित धाक, काळजी मिश्रित आदर ही भावना खोलवर बिंबवते . हा मायेचा आणि प्रेमाचा मुलामा खोटा नक्कीच नसतो परंतु तितकासा निरागस ही नसतो असे मला पावलोपावली जाणवले आहे. त्याचच रूपांतर पुढे दुबळ्या घाबरट, परावलंबी, हटवादी, अयशस्वी मुलामुलींमध्ये होतं.

मी तुला जन्म दिला, 9 महीने पोटात वाढवले, तुला चांगले संस्कार दिले, तुझ्यासाठी खस्ता खाल्ल्या. कष्ट केले, त्याग केले, असं थेट किंवा अप्रत्यक्षपणे मुलांवर बिंबवून त्यांच्या मनात ‘मातृदेवो भव’ असा भाव निर्माण करणे हे पिढ्यानपिढ्या आणि सर्रास चालणारे षडयंत्र आहे. याला उत्तर म्हणून एखयाद्या मुलाने किंवा मुलीने “ मला जन्म द्यायला मी तुला सांगितल नव्हत.” असं उत्तर दिलं तर समस्त समाज त्याच्यावर किंवा तिच्यावर असंस्कृत असा शिक्का मारायला मागेपुढे पाहणार नाही. परंतु यात काय चुकीच आहे ? कुठल्याही आईच्या कानात किंवा स्वप्नात बाळानी येऊन, “मला जन्माला घाला. मला या जगात यायचय.’ अशी विनंती केल्याचे ऐकिवात नाही. आपण मुलांना त्यांच्या सोयीसाठी अथवा इच्छेसाठी जन्माला घालत नसून संपूर्णपणे आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, नैसर्गिक, हिशेबी इच्छेखातर जन्माला घालतो हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असले तरी दुर्दैवाने ते समाजमान्य नाही.

वयाच्या 60 त पोचलेल्या ‘मुलांच्या’ आयुष्यावरचा आपला हक्क न सोडण्यासाठी स्त्रिया जी अमाप ताकद वापरतात तिची तुलना तिनेच ह्याच मुलाच्या जन्माच्या वेळेस लावलेल्या शारीरिक ताकदीशीच होऊ शकते.

लहानपणापासून मुलाला पडूच न देणे, त्याच्यावर 24 तास घारीसारखे लक्ष ठेवणे, त्याला रडू न देणे, थोडक्यात स्वत:हून काहीच न करू देणे पर्यायाने त्याच्या संपूर्ण आयुष्यात ढालीसारखे त्याच्या पुढ्यात उभे राहून सर्व वार स्वत: वर घेऊन आणि असे वागून आपण उत्तम आई बनण्यासाठी कसे झटत आहोत हे स्वत: ला आणि इतरांना अधोरेखित करून सांगणे यामुळे त्या जीवाचे माणूस म्हणून किती अपरिमित नुकसान होत आहे हे लक्षात येत नसलेल्या आया पाहून माझे हृदय तुटते .

तुम्ही त्या मुलाला जन्म दिल्यानंतर जोपर्यंत तो शारीरिक आणि मानसिक रित्या वयात येत नाही तोपर्यंत आणि केवळ तोपर्यंतच त्याला चांगलं माणूस बनण्यासाठी जीवनशिक्षण देणे हे आणि एवढेच पालकांचे काम आहे. आपल्याला त्याची ढाल बनायचे नाही त्याला स्वत:ची ढाल स्वत: बनायला शिकवायचे आहे हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत ही मूर्तिपूजा थांबणार नाही.

माझ्या आईने मला जन्म दिला हयाबद्दल मी आनंदी आहे. तिने माझ्यासाठी केलेल्या कष्टाची आणि त्यागाची मला जाणीव आहे. परंतु माझ्यावर तिचे उपकार नाहीत हे मुलं आणि आया दोघंही समजून घेतील तेव्हा खऱ्या बदलाची सुरुवात होईल. खऱ्या निखळ नात्याची सुरुवात होईल.

आई-वडिलांना वाऱ्यावर सोडा असा या लेखाचा आशय नाही. परंतु आता आमची आयुष्य आणि तुमची आयुष्य वेगवेगळी आहेत हे समजून घेऊन दोन्ही पक्षांनी जगणे सुरू केले तर पालकांची आयुष्य आनंदी आणि तरुण पिढीची आयुष्य सोपी होतील. त्यामुळेच आई-बाबांना घरातून हाकलून देण्याचे, आई बाबांनी मुलांशी संबंध तोडण्याचे प्रमाण कमी होईल.

आपल्या मुलांचे जन्म ही आपल्या आयुष्यातील एक घटना असून आपले आयुष्य नाही. आपल्याला पालक बनायचे आहे का ? का बनायचे आहे? कधी बनायचे आहे? त्या मुलाला किंवा मुलीला कशा प्रकारचे आयुष्य देऊ करायचे आहे ? ह्याची स्पष्ट उत्तरे मिळल्याशिवाय जगराहाटी म्हणून मुलांना जन्म देण्याची चूक 21 व्या शतकात कुणीही करू नये यासाठीच हा एक प्रयत्न !

तळटीप : आई ही माणूस आहे देव नाही त्यामुळे पूजा नको प्रेम द्या !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा