रविवार, २५ एप्रिल, २०२१

त्याग (वगैरे!)


त्याग (वगैरे!)


            मी,  मला आणि माझं या शब्दांना स्वार्थीपणाची झालर इतकी बेमालूम चिकटलेली आहे  की गरजेच्या वेळी सुद्धा हे शब्द वापरायची भीती वाटते. “सारखं मी मी माझं माझं करू नये. आपलं आहे म्हणावं, “मुलांना कशाला हवी personal space?”, “Sharing is caring". “घर म्हणलं की adjustment आलीच.  ह्या सगळ्या नैतिक शिकवण्या ऐकतच आपण मोठे होतो. आणि हळूहळू आपलं सगळं इतरांना देऊन टाकतो.  आपला वेळ, आपली शक्ति, आपल्या इच्छा, आपली स्वप्नं, आपले विचार ह्या सगळ्या अतिमहत्त्वाच्या गोष्टी आपण इतरांच्या ओंजळीत अलगद सोडून देतो आणि स्वतः पोकळ होतो. नेमक गरजेच्या वेळी ‘आपलं’ असं आपल्याकडे काही राहातच नाही आणि दुर्दैवाने तेव्हा फार उशीर झालेला असतो. आपला आपल्यावरचा मालकी हक्क आपण विसरूनच गेलेलो असतो. 


          समाजाच्या सोयीसाठी याच नाव ‘त्याग’ असं ठेवलं गेलेलं आहे. हाच तो त्याग ज्याचं उदात्तीकरण आपण सगळीकडे बघत असतो. हे त्यागाच गारूड इतक भयंकर असत की आपल सगळच कुणालातरी बहाल करण्याची घोडचुक निव्वळ आपला भोळेपणा हे दोन्ही त्यागाच्या नावाखाली अलगद लपवल जात. वस्तुतः मूर्ख बनलेलो असताना त्याला ‘त्यागमूर्ती’ हे पूजनीय नाव दिलं जातं. त्यागाची ही नशा वेळोवेळी चटके बसूनही उतरत नाही आणि आपण काही सुधरत नाही. काही गरज नसताना ‘त्याग-त्याग’ खेळून ‘त्यागमूर्ती’ बनणे हा आपल्या समाजाचा छंदच आहे. 


          त्याग ही फार मोठी, खोल आणि विचारपूर्वक केलेली कृती आहे,  पावलोपावली इतरांसाठी केलेल्या लहानसहान गोष्टीना त्याग म्हणत  नाहीत हे आपण कधी समजून घेणार? अश्या त्याग मूर्ती आपल्याला येता जाता बघायला मिळतात. “मी ‘अमुकतमुक’साठी सगळ कस सोडलं, माझ असं काहीच ठेवल नाही, हे स्वतःहून सांगणार्‍या लोकांना ‘कशाला सोडलत?, ‘कोणी सांगितल होत का? असे प्रश्न विचारणारे लोक मग निर्लज्ज दिसतात. आपण कुठल्या प्रकारचा त्याग कुणासाठी, कधी आणि कुठल्या परिस्थितीत करतो याची उत्तर आपल्या मनाला मिळाल्याशिवाय तो करण याला कदाचित वेडेपणा म्हणतात.  जे खरोखरीचा त्याग करतात ते सगळ्या जगाला त्याविषयी सांगत सुटत नाहीत कारण तो इतरांना दाखवण्यासाठी किंवा छाप पाडण्यासाठी केलेलाच नसतो. त्याग हा आपल्याला दिसतो, जाणवतो किवा जग आपल्याला त्याविषयी सांगत. ती व्यक्ति नाही जी त्याग करते.


          पिढ्यानपिढ्या चालत आलेली, आपल्याला शिकवली गेलेली प्रत्येक गोष्ट बरोबरच असते असं नसत. एखादी गोष्ट पुढच्या पिढीकडे  सोपवताना त्याची किमान चाचपणी करणं, आणि आपल्या बुद्धीला ते पटलं नाही तर त्याच आंधळ हस्तांतरण न होऊ देण फार आवश्यक आहे. कितीही नातेसंबंध निर्माण केले तरी आपण एकटे येतो आणि एकटे जातो. मग मधल्या प्रवासात ‘आपलं’ आपल्याकडे काहीच असू नये? आपल्या आयुष्यातील जितक्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्याला जबाबदार फक्तं आपण असतो. आपल्या आयुष्याच्या दोरया इतरांकडे देण्यास नकार देण हा जर स्वार्थीपणा असेल तर होऊच यात आपण थोडे स्वार्थी!


(हा लेख त्याग या गोष्टीला क्षुल्लक मानणारा नाही. त्यागाच्या चुकीच्या कल्पनांवर प्रकाश टाकण्यासाठी लिहिलेला आहे.  समाजात वावरताना केलेल्या निरीक्षणांवर आधारित आहे तसेच हे माझे वैयक्तिक मत आहे . याची कृपया नोंद घ्यावी.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा