मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०२१

नाम ही काफी है।


नाम ही काफी है।

 संज्ञा !


माझ्या ह्या विलक्षण नावाचा महाराष्ट्र सोडल्यावर इतक्या वेळा खून होणार आहे हे जर माझ्या आईला आधी कळलं असतं तर कदाचित आज माझंही नाव 'एक हाक मारली की 10 धावत येतील' या प्रकारातलं ठेवलं गेलं असतं.

'सं' आणि ज्ञा ही दोनच अक्षरं असलेलं माझं छोटसं, छानसं नाव या परराज्यातील तोंडातल्या तोंडात, अस्पष्ट बोलणार्या लोकांना बोलता येणं कितीही अशक्यप्राय असलं तरी दरवेळी त्यांच्या सदोष उच्चारण कलेवर मला तितकाच राग येतो. तसेच त्यांना आपल्या नावाचा उच्चार करता येत नाहिये याचं जराही वाईट वाटत नाहिये यावर अजून जास्त राग येतो.

कुठल्याही नवीन अमराठी माणसाला मला माझं नाव किमान दोन ते तीन वेळा समजावून सांगावं लागतं. एकदा सलगपणे, एकदा दोन्ही अक्षरांवर जोर देऊन, एकदा 'लिप-मुव्हमेंट' वापरून. पण दर वेळी माझे अथक आणि प्रामाणिक प्रयत्न वाया जातात आणि माझ्या नावाची सौदन्या, सौधन्या , संदनया , संग्या, संध्या इतकेच नाही तर अगदी सुगंधा, सुक्ष्मा इ. 100 शकले होतात. नवीन ओळख होतानाचा माझा संवाद ठरलेला असतो.
"आपका नाम क्या है?"
"संज्ञा."
"क्या ?"
"संज्ञा. सं ज्ञा. S O U D N Y A." ( इग्रजीमधे अशाप्रकारे शब्द-फोड केल्यावर काही लोकांना थोडंफार लक्षात येत किंवा किमान ते तसं दाखवतात तरी.)
आता कुणीही नाव विचारल्यावर पहिल्यांदा मनात हेच येतं, " रेहेने दो वैसे भी आप बोल नाही पाओगे!" पण इतका उच्चकोटीचा आगाऊपणा करायला मन अजून धजावत नाही.

पहिल्यांदा माझं नाव ऐकल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया मजेदार असतात. काही लोक सुरुवातीलाच पांढरे निषाण फडकवून 'मिसेस पेंड्से' वर उतरतात. काही लोक जिभेला धार लावायचा विफल प्रयत्न करून बघतात. थोडेसे 'जिव्हापिडन' झाले की प्रयत्न आणि मला दोन्ही सोडून देतात. तिसर्या वर्गातील लोक मात्र इरेला पेटतात. पुरती बोबडी वळेपर्यत ते शस्त्र टाकत नाहीत. माझ्या नावाच्या बर्यापैकी जवळचा उच्चार ते करूनच सोडतात. काही लोकांना नुसतं ऐकूनच लक्षात येतं की हे काही आपल्या आवाक्यातलं काम नाही मग ते चलाखीने 'अच्छा है ! अलग है।' वगैरे म्हणून अलगदपणे आपल्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालतात. काही लोक 'नाचता येइना अंगण वाकडे' प्रकारातले असतात 'सं ज्ञा' म्हणता न आल्याने माझ नाव त्यांच्या लेखी मग 'अजीब' आणि 'नामुमकीन' होतं. काही लोकं,' पडलो तरी नाक वर' या प्रकारातले असतात. स आणि ज्ञ या अक्ष्ररांच्या जवळपास जाणारे विचित्र उद्गार काढून आपण कसं बरोबरच उच्चारलं आहे हे मला पटवून देतात. मनातल्या मनात कपाळावर हात मारल्याशिवाय मग माझ्याकडे दुसरा काही इलाज रहात नाही.

अश्या या पेचप्रसंगांतून मला नेहेमीच जावं लागतं म्हणून नव्याने पालक बनणार्या लोकांना माझी विनंती आहे की आपल्या मुलांची दुर्मिळ नावे ठेवायची असतील तर त्या नावांच्या उच्चाराबरोबरच मुलांना अमाप सहनशक्ती, धीर आणि न रागवता चिकाटीने ते समजावून सांगण्याची कला हे ही शिकवणे अत्यंत गरजेचे आहे.

अर्थात कानावर कितीही अत्याचार झाले तरी मला माझे नाव अत्यंत प्रिय आहे. कारण माझ्या नावाच्या उच्चारादरम्यानच लोकांना जो चटका बसतो तो माझ्या व्यक्तिमत्वाची झलक देण्यासाठी पुरेसा असतो. सं ज्ञा!
नाम ही काफी है!

-संंज्ञा घाटपांंडे -पेंंडसे



.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा