मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०२१

आर्टिस्टांची लक्षणं

 आर्टिस्टांची लक्षणं


हे ‘चेतावणीपत्र’ त्यांच्यासाठी आहे ज्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, व्यावसायिक अश्या कुठल्याही प्रकारे ‘आर्टिस्ट’ या जमातीशी संबंध येतो. या लोकांशी व्यवहार करणं हे अत्यंत धोक्याचं, जिकिरीच आणि नाजूक काम आहे. ‘आर्टिस्टांपासून सावध रहा’ अशी पाटी घरासाठी बनवून घेता आली तर उत्तम. ज्यामुळे त्यांचा लहरीपणा, आगाऊपणा, माणुसघाणेपणा, विक्षिप्तपणा, विसराळूपणा, यांचे खापर तुमच्या माथी फुटणार नाही.
आर्टिस्ट्स बरोबर एकाच घरात राहायचे असेल तर शांत राहण्याची आणि सोडून देण्याची कला तुम्हाला अवगत असायलाच हवी. मुख्य म्हणजे ‘ते या जगात नसतात त्याचं वेगळं जग ते निर्माण करतात’ हे सत्य तुम्हाला पचवायला हवं.

गबाळग्रंथ, एक-दुसर्याचा दुरान्वयही संबंध नसणारे कपडे घालून, केस वगैरे न विंचरता, घरगुती चपला घालून बाहेर पडताना, ‘आरशात तरी बघितलयस का?’ असे चिथावणीखोर उद्गार काढायचा वेडेपणा अजिबात करू नये. ‘आर्टिस्ट’ हा जन्मजात आळशी असतो. स्वत:चे अढळपद सोडून, बुड हलवून तो घराबाहेर जात आहे, हीच मुळात किती स्तुस्त्य गोष्ट आहे हे सामान्य माणसांना समजणार नाही. मग नंतर, “मी माझ्या कामाला चाल्लोय. इतरांना नेत्रसुख द्यायला नाही.” अश्या प्रकारची उत्तरे मिळाल्यास समस्त आर्टिस्ट जमातीवर निर्लज्जपणाचा ठपका ठेवणे अत्यंत अन्यायकारक आहे.

कलाकाराला कला ‘होत’ असताना मध्ये मध्ये बोटं लावायला जाऊ नये. ती एक खूप क्लिष्ट आणि लांबलचक प्रक्रिया आहे. ती आपल्या गतीने आणि लहरीने होते. कलेची ‘डिलिव्हरी’ नेहेमी नॉर्मलच होते. कलेचं कधी ‘सिझेरिअन’ करता येत नाही. त्यामुळे “पटकन सुचव नं! किती वेळ!” असे खोचक टोमणे शेजारी उभं राहून मारू नयेत.

कलाकाराला काहीतरी मोठं, अद्वितीय, भन्नाट सुचत असताना, “जेवलीस का?”, “अंघोळ केलीस का?” वगैरे असे क्षुद्र प्रश्न विचारून त्यांचा समाधी भंग करू नये. एखाद्या सुंदर कल्पनपुढे शिळं, गार, कमी, नावडीचं जेवण कलाकाराच्या लेखी काहीच नसत. मुळातच जेवण, झोप, अंघोळ, दिवस-रात्र कलेपुढे हे सगळं शुल्लक असत. (कलाकारापुढे असं म्हणणं जास्त योग्य ठरेल कारण त्याची इच्छा असताना साग्रसंगीत जेवण, १२-१५ तास सलग झोप, हे सगळं कसं मिळवायचं हे त्यांना ठाउक असतं.)

चित्रकार कलेत बुडालेला असताना, खास करून रंग, पाणी घेऊन बसलेला असताना, त्याच्यापुढे चहा-कॉफी चे कप ठेवण्याचा प्रेमळपणा करू नये. असे केल्यास चहाच्या कपात रंगाचा ब्रश बुडालाच म्हणून समजा. संपूर्ण कारकिर्दीत एकदा तरी हा खूळचटपणा केल्याशिवाय कलाकार ‘कलाकार’ म्हणला जाऊ शकत नाही. तसा नियमच आहे.

‘चित्र काढून पैसे कसे कमावणार?’ एवढ्याश्या पैशात संसार चालणार आहे का?’ वगैरे चिल्लर प्रश्न विचारायच्या आधी, “ए, माझं पोर्ट्रेट काढून दे नं भारीतलं.”, “ए ही एक आकृती काढून दे नं इथे शेजारी”, “अरे हे खूप सोपं आहे. हे बघ. इथे हॅपी बड्डे लिही, इथे केक टाक की झालं ग्रीटिंग तयार.”, “काय यार! याचे पण पैसे घेणार का तू माझ्याकडून आता?” असं म्हणणारे आपणच तर पहिले नव्हतो नं? हे एकदा जरूर तपासून पहावं. कलाकाराचा उजवा मेंदू अजिबातच चालत नाही असं नसतं. आपल्यापुरते पैसे कमावणे, किवा आहे त्या पैशात मजेत राहणे यापैकी एक गोष्ट प्रत्येक कलाकाराला नक्कीच जमते.

कलाकारी हा अत्यंत खर्चिक प्रकार आहे. त्याला कोणीच काही करू शकत नाही. “मागच्याच आठवड्यात तर नवीन रंग आणले होते, त्याचं काय झालं?” असे प्रश्न विचारल्यास रागीट कटाक्षांशिवाय दुसरं काही मिळण्याची अपेक्षा ठेवू नये. चित्रविचित्र शौक पाळण्यापेक्षा रंगांवर खर्च होणे कधीही उत्तम!

तुम्ही ‘आर्टिस्ट’ बरोबर राहणारे ‘नॉन-आर्टिस्ट’ असाल तर, ‘मॅजेंटा’ कलरची बॉर्डर वाला ‘व्हर्मिलियन’ कलरचा कुरता बरोब्बर शोधून काढणं, किवा ‘वॅनडाईक ब्राऊन’ कलरच्या कपाटातून ‘कोबाल्ट ब्लू’ कलरचा शर्ट शोधणं तुम्हाला शिकून घ्यावं लागेल. तुम्हाला रंग कळत नसतील तर शेंबडा कलर, शी कलर, सिमेंट कलर, आमसूल कलर, चटणी कलर, याच भाषेत तुम्हाला रंगसंगती समजावली जाईल.

गणित न येणं हे खर्या कलाकाराच प्रमुख लक्षण आहे. आकडेवारी बोटं मोजत करणं, १८+२२ साठी लगेच कॅलक्युलेटर’ शोधण, बँकेचे व्यवहार, इंशुरन्स, पोलिसीज वगैरे विषय आयुष्यात आल्यावर आकाशात बघणं हे कलाकाराचे मुलभूत गुण आहेत. आता कलाकाराला अशी दैवी देणगी मिळाल्यावर घरातल्या इतर लोकांना त्याच्या या अश्या लहान-सहान गोष्टी निस्तरणं क्रमप्राप्तच आहे.
आर्टिस्ट तुमच्याकडे बघत असेल तरी त्याला तुम्ही दिसत असालच असं नाही. दिसणं, आणि दिसलेलं नोंदलं जाणं यातला फरक आर्टिस्ट तुम्हाला हळूहळू शिकवेल, दुधाकडे बघत असतानाही दुध उतू जाणं, एखाद्याला विचित्र वाटेल इतपत टक लावून त्याच्याकडे बघणं किवा एखादा बोलत असताना त्याच्याकडे ढुंकूनही न बघणं हा आगाऊपणा नसून अत्युच्च सृजनशीलतेचं लक्षण आहे. आर्टिस्ट ना कधीही, कुठेही, काहीही सुचत असू शकतं, आणि दुर्दैवानी ‘मल्टीटास्कींग’ त्यांना जमत नाही. त्यामुळे विचार करताना ते फक्त विचारच करू शकतात. १-२ तास नुसतं बसणं, अगदी काहीही न करता याकडे इतरांनी रागानी नाही तर पवित्रपणे पाहायला शिकलं पाहिजे.

त्याचप्रमाणे, मधूनच अचानक ‘अरेरे’!, ‘शी’, ‘वाह!’ असे उद्गार ऐकू आल्यास, काहीही कारण नसताना, गडगडाटासारखे हास्य ऐकु आल्यास, अचानक डोळे डबडबलेले दिसल्यास घाबरून जाऊ नये, ही वेडेपणाची किवा प्रेमाची लक्षणे नसून ‘आर्टिस्टपणाची’ लक्षणेही असू शकतात. इतके भावनाप्रधान विचार असल्याशिवाय आतून एखादी कला बाहेर पडणं निव्वळ अशक्य आहे.

विसराळूपणा आणि आर्टिस्ट यांचा घनिष्ट संबंध असतो. ‘आपण एखाद्या खोलीत का आलो?’ हे विसरणे, अंघोळीची सर्व तयारी करून अंघोळीला जायचं विसरणे, सकाळी काय खाल्लं हे प्रयत्न करूनही न आठवणे, कुकरला लावलेला भात विसरल्यामुळे जळून जाणे या फार सामान्य घटना आहेत. त्यासाठी दवाखाना गाठायची गरज नाही. याच आर्टिस्ट ना अचानकपणे १० वर्षापूर्वी कोणी कोणाला काय बोललं होतं?, एखाद्या २० वर्षापूर्वीच्या बारशात कुणी कुठल्या रंगाचा झब्बा घातला होता हे अचूक आठवतं. याचाच अर्थ डोक्यात काही बिघाड नसतो. फक्त सामान्य माणसाकडे आठवणीचे पद्धतशीर कप्पे असले तर आर्टिस्टच्या डोक्यात पसारा असतो त्यामुळे त्याच्या मेंदूला एवढ्या अवाढव्य दस्तऐवजांमधून एखादी ठराविक गोष्ट शोधायला जर जास्त वेळ लागतो इतकच.

‘शौचालय’ हे आर्टिस्टचं दुसर घर असतं. आतमध्ये जर तो बराच वेळ काढत असेल तर याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असता. कारण बाहेर हवा तेवढा शांतपणा न मिळाल्यामुळेच त्याच्यावर आत बसून विचार पूर्ण करण्याची वेळ येते. अर्थात आतमधल्या बैठकीइतकी फलदायी बैठक दुसरी नसते. तिथे बसून सुचणाऱ्या कल्पना उच्च दर्जाच्या असतात. त्यामुळे बाहेरून. “किती वेळ लागणारे? झोपला आहेस का आतमध्ये?” अशी आगपाखड करण्यापेक्षा आर्टिस्ट आत शिरायच्या आत आपले कार्यक्रम उरकून घेणे सोयीस्कर!

एखाद्या मुरलेल्या आर्टिस्ट बरोबर कौटुंबिक समारंभांना जायची वेळ आल्यास एखादा हातरुमाल अथवा तत्सम गोष्ट नक्की बरोबर घ्यावी. आपल्याला तोंड झाकायला उपयोगी पडते. कारण, “काय चरबी ओसंडतीए या बाईची”, “किती ‘मिस-प्रपोरशनेट’ माणूस आहे नाही!”, “अहो तुम्हाला लाईट कलर सुट नाही होणार. तुमचा स्किन टोन डार्क आहे ना.” अशी कुठलीही विधान हे लोक खुलेआम करू शकतात. तेव्हा त्यांच्या बरोबर तुम्हालाही उद्धट, मवाली, लफंगे या वर्गात गणलं जाऊ शकतं.

एकंदरीतच आर्टिस्ट जमातीबरोबर राहणं काही लोकांना काळ्या पाण्याच्या शिक्षेसमान वाटू शकतं; परंतु ही जमात नष्ट झाल्यास संपूर्ण मानवजातीचे आयुष्य सर्व अर्थाने निरर्थक होईल हे नक्की. आयुष्य प्रत्येकालाच मिळतं पण ते सुंदर बनवायचं काम हे लोकं करत असतात त्यामुळे ‘सेहे लेंगे थोडा’ असा विचार करून तुमच्या आयुष्यातल्या अश्या वेडगळ ‘आर्टिस्ट’ला जपून ठेवा.

©संज्ञा घाटपांडे-पेंडसे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा