मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०२१

पाळी

पाळी

 डिस्क्लेमर

माझ्या या लेखाला मी स्वतः च 'A' सरटिफिकेट देते. त्यामुळे ज्यांचे 'मानसिक' वय १८ च्या अलीकडे आहे किवा 'पाळी' शब्द ऐकल्यावर जे कान, नाक, डोळे मिटून घेणारी माकडे बनतात त्यांनी व्यक्त केलेली नाराजी ग्राह्य धरली जाणार नाही.

पाळी
एक, दोन किंवा जास्तीत जास्त ३ वेळा नवनिर्मितीचा आनंद घेण्याच्या बदल्यात दर महिन्याचा हा हकनाक रक्तपात म्हणजे निसर्गाने केलेला भ्रष्टाचार नाही तर अजुन काय आहे?
वयाच्या १३ - १४ वर्षापासून ते ४५-५० वर्षापर्यंत ही 'मासिक पाळी' वेताळासारखी समस्त स्त्री जातीच्या मानगुटीवर बसून राहते. निसर्गाच्या या अजब, अतार्किक हिशोबची उकल मला आजतागायत झालेली नाही. विज्ञान इतके प्रगत होऊनही निसर्गाची ही घोडचूक सुधारण्यासाठी कुठलाही खात्रीशीर आणि सुरक्षित उपाय मानवजातीला सापडलेला नाही हे विशेष खेदजनक आहे.
जी मुलगी स्वतः अजुन बाल्यावस्थेत आहे तिला नवनिर्मितीची देणगी देऊन फायदा काय ? तसेच जी बाई स्वतः च्या नातवंडांच्या आगमनाची वाट पहात आहे तिच्याकडे ही शक्ती शाबूत ठेवून तरी फायदा काय ?
याचा काहीच ताळमेळ बसत नाही. गणित काही फक्त माझेच कच्चे नाही. थोडक्यात चुका कुणालाच चुकलेल्या नाहीत.

दर महिन्याला या सर्वाधिक नावडत्या गोष्टीची वाट बघावी लागणे या वाक्यातच किती विरोधाभास आहे!
पाळी आली तरी कटकट नाही तरी कटकट. तारखांबरोबरचा हा खो-खो सर्वच स्त्रीयांना अटळ आहे.

सण - समारंभ हिला विशेष आवडतात. काहीही करून तारखा जुळवून आणणे यामध्ये तिला एक प्रकारचा आसुरी आनंद मिळत असला पाहिजे. तसेच प्रवासात अनपेक्षित रित्या अवतरणे हा तिचा छंद आहे. हिच्या लहरी सांभाळणे हे स्त्रियांचे अनैच्छिक कर्तव्य आहे.

पाळी शांतपणे येते आणि जाते असे असते तरी सुसह्य झाले असते परंतु तसे होत नाही. येताना ती पोटदुखी, कंबरदुखी, राग, चिडचिड, कंटाळा नैराश्य असा गोतावळा बरोबर घेऊनच येते. या काळात या सर्वांना सोबत घेऊन चेहऱ्यावर हसू ठेवून नेहमीची दिनचर्या पार पाडणे म्हणजे तारेवरची कसरत असते.

तारखा जवळ आल्या की हृदयाचे ठोके वाढतात. आपण कुठे, काय करत असताना गळती सुरू होईल याचा काही नेम नसतो. जय्यत तयारी केलेली असताना न येणे आणि कल्पनाही केलेली नसताना येणे हाही तिचा छंद आहे. आपली झालेली पंचाईत बघून तिला समाधान मिळत असावं.

समस्त स्त्रीलिंगी व्यक्तिंप्रमाणे हिलाही हिच्यावर पैसे उधळलेले आवडतात. तिला शोषून घेण्यासाठी दर महिन्याला खर्च केलेल्या प‌ॅडस्, टॅंपॉन्स अथवा तत्सम गोष्टींची बचत करता आली असती तर आज मी अति- श्रीमंत वर्गात गणले गेले असते.

घरोघरी बघितल्या जाणाऱ्या मालिका अथवा सिनेमांमध्ये, "मी तुला ९ महिने पोटात वाढवले इ. इ."महा गुळगुळीत, रटाळ डायलॉग ऐवजी, "मी तुझ्यासाठी ३० वर्ष पाळी सहन केली."हा डायलॉग लिहीण्याची हिम्मत एखाद्या तरी सृजनशील लेखकाने दाखवली तर तो अधिक ह्र्दयांना स्पर्शून जाईल.

एरवी आम्ही सामान्य महिला पाळीच्या नावाने बोटे मोडत असताना, 'पाळी ही कशी सुंदर गोष्ट आहे, आपल्याला निसर्गाने किती मोठी शक्ती दिली आहे, पाळी कडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलायला हवा.' वगैरे खुळचट, कुचकामी विचार मांडणारा एक अविश्वसनीय, फुटीरवादी गट आमचे मतपरिवर्तन करण्याचा क्षीण प्रयत्न करत असतो. या गटाकडे आम्हा सर्व पीडित महिलांची गर्भाशयं सांभाळायला द्यायला हवीत. पोट धरून, वाहणाऱ्या रक्ताकडे बघताना, 'पाळी ही एक सुंदर गोष्ट आहे.' असा संदेश माझा मेंदू तरी मला कदापि देणार नाही. रक्ताचा एक एक थेंब असा वाया जाताना बघून मनाला यातना होतात. यासाठी माझ्या दातांनी किती अन्न चावले असेल, माझ्या पचनसंस्थेने किती अन्न पचवले असेल याला गणतीच नाही. शक्तीचा आणि रक्ताचा किती हा अपव्यय!

निसर्ग एवढाच जादुई असता तर त्याने थोडी दयाबुध्दी दाखवून आम्हाला 'प्रजनना' ऐवजी 'दुभाजना' ची शक्ती द्यायला हवी होती. अत्यल्प पुनरुत्पादन साठी ३० वर्ष ही मासिक आणि मानसिक छळ छावणी सहन करणे हा कुठला न्याय? एका हाताने वरदान आणि दुसऱ्या हाताने शाप याला काय अर्थ आहे ?

सुरुवातीच्या काळात पाळी बद्दल वाटणाऱ्या लाजेची जागा आता निर्लज्जपणानी घेतली आहे. 'मला बरं नाही.' वगैरे थोतांड सांगण्यापेक्षा आता मी सरळ 'माझी पाळी चालू आहे मी येणार नाही.' असे सांगू शकते. जे स्त्रियांना सहन करावं लागत ते जगाला ऐकून घ्यावं च लागेल.

डोळे गच्च मिटून, सर्व शक्ती एकवटून, या अग्निपरीक्षेतून पार होताना, आज पूजेला येणार नसशील ना? असल्या फाजील, अंधश्रद्धाळू, भोचक शंका घेऊन अनेक स्त्रीशत्रू आमच्या भोवती उभे राहून आगीत तेल ओतण्याचे काम मनोभावे करत असतात. त्यांच्याशी त्वेषाने लढायचे मी आता सोडून दिले आहे. एक छद्मी हास्य फेकून नटून थटून मी पूजेला हजर होते हेच त्यांना चोख उत्तर! असलाच जर देव तर त्यानेच निर्माण केलेली गोष्ट त्याला चालवून घ्यावीच लागेल की!

पाळी ही निव्वळ कटकट आहे. त्या सुमारास आमच्या भोवती एक धोकाप्रवण वलय तयार होते. त्यात आजूबाजूची मंडळी आल्यास आणि आमच्या परिस्थितीजन्य आगडोंबाची शिकार झाल्यास निसर्गाला काय ते बोलावे कारण पाळी ही जर निसर्गाची किमया असेल तर आमचा लहरीपणा ही सुद्धा निसर्गाचीच किमया आहे.

या संवेदनशील काळात पुरुष वर्गाने आम्हा आजूबाजूच्या स्त्रियांना निमूटपणे जपणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. पाळी आहे म्हणून तुम्ही आहात, याची पदोपदी जाणीव ठेवून या दिव्यातून पार होण्यास जमेल तसा आधार देण्याची आता पुरुषांची पाळी आहे.

- संज्ञा घाटपांडे पेंडसे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा