मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०२१

मी आणि माझी युद्धभुमी

 मी आणि माझी युद्धभुमी


स्वयंपाकघराचा माझ्याशी कधी पुसटसाही संबंध येईल असं मला वाटलं नव्हतं. तोपर्यंत 'आई' नावाची भिंगरी माझ्या मागे-पुढे सतत असायची. आई कामाला गेल्यानंतरच्या कष्टप्रद जीवनात स्वत:चं बुड उचलून पाणी आणायला किंवा खाऊचे डब्बे धुंडाळण्यासाठी किंवा चहाची तीव्र तल्ल्फ शमवण्यासाठी एवढेच काय ते त्या भागात जाणे होत असे. लग्न झाल्यानंतर मी पहिल्यांदा या युद्धभुमीवर पाऊल ठेवले.

चित्रविचित्र, कडक नकाशे पचवल्यानंतर, बेचव भाज्या घशाखाली उतरवल्यानंतर, पचनसंस्थेने असहकार पुकारल्यावर मात्र मला या कलाशास्त्राला गंभीरपणे घ्यावेच लागले.

शब्दशः 'Do or Die' हे तत्त्व स्वीकारुन मी लढायला तयार झाले. नेहेमीप्रमाणे 'One Man Army' स्टाइलने!

त्या निर्मनुष्य भागात शिरल्यावर डाळ, तांदूळ, कणीक अश्या मला अनेक कुतुहलजनक गोष्टी मला दिसल्या. सरसकट डबा आणि भांड सोडून मी ग़ंज, वाडगा, मिसळण वगैरे वर्ग़ीकरण करायला शिकले. पोळी करताना स्वतः प्रदक्षिणा न घालता अथवा पोळपाट गोल न फिरवता पोळ्या लाटायला शिकले. कुकर नावाचं वैज्ञानिक खेळणं वापरायला शिकले. भुकेचे रोजचे हल्ले परतवता‌-परतवता मी नकळतपणे तरबेज होऊ लागले. खिचडी मुगाच्या डाळीची बनते. चण्याच्या डाळीची नाही. हे आता मला समजले आहे. एवढेच नाही तर चण्याची डाळ म्हणजेच हरभर्याची डाळ हे सुद्ध: मी ओळखले आहे. पाण्यात पडल्यावर पोहोता येते त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात धडपडल्यावर स्वयंपाक येतोच हे माझ्यासारख्या शेंडेफळ पोरीने सिद्ध करुन दाख़वले आहे. या प्रगतीबद्दल मला माझा अभिमान वाटतो.

याचे श्रेय अर्थातच फोनवर माझ्या असंख्य वायफळ प्रश्नांना सहनशीलपणे तोंड देणार्या माझ्या आईला, माझ्या घोर अज्ञानावर न हसता मला सोप्या, नवीन पदार्थांच्या रेसिपि देण्याची जिद्द दाखवणार्या माझ्या सासुला, वयाच्या 80व्या वर्षी माझ्या बरोबरीने मैदानात उतरणार्या माझ्या आजेसासुला, माझ्या जळक्या काचर्यांच्या खरपुड्या मागून खाणार्या माझ्या उदार बाबाला आणि माझी टणक साबुदाणा खिचडी खुषीने खाणर्या माझ्या शूर नवर्याला आणि सासर्यांना जाते.
त्यांच्याशिवाय माझा या युद्धभुमीवर टिकाव लागणे निव्वळ अशक्य होते.

माझ्या हातचे अन्न आता गायी-म्हशी, डुकरे, कुत्री यांना न जाता मनुष्यप्राण्यांना खाता येण्याइतपत चविष्ट होऊ लागले आहे; हे किती कौतुकास्पद आहे! पोळी, भाजी, आमटी कोशिंबीर अश्या एक-एक पायर्या चढत चढत इडली, डोसा, असे दाक्षिणात्य पदार्थ, पालक-पनीर मॉं की दाल, असे उत्तर हिंदुस्थानी पदार्थ बनवण्याइतपत माझी मजल गेली आहे. हल्लीच माझ्या पाककलेत 'केक' ची भर पडली आहे. केवळ 3 वर्षातील ही देदीप्यमान कामगिरी थक्क करणारी आहे.

आजकाल स्वयंपाकघरात उभं राहून पांढरे निशाण फडकवत हताशपणे आपला पराभव स्वीकारणारी 'मी' माझ्या स्वप्नांत वरचेवर येत नाही हा माझ्या पाकप्रगती चा भक्कम पुरावा म्हणता येईल. मला माझ्याकडून माझ्या भविष्यातील 'पाकप्रवासा'साठी खूप खूप शुभेच्छा! खात रहा ! खिलवत रहा!

ता.क. स्वयंपाक मला कालही आवडत नव्हता आणि आजही आवडत नाही. हे वाचून अनपेक्षित धाडी अपेक्षित नाहीत.

-संज्ञा घाटपांडे‌‌-पेंडसे




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा